सूर्यनमस्काराची निर्मिती
रथसप्तमीबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व कसे जोडले गेले आहे, तसेच सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व अभ्यासण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच-
सूर्यनमस्काराची निर्मिती
माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
प्राचीन सूर्यमंदिरे व सूर्योपासना यांचे महत्त्व
सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती, अशा कोणत्याही स्वरूपात सूर्योपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी, स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्तीही सुधारते.
भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ तीन ते चार किमीवर हे नितांत सुंदर देवस्थान वसलेले आहे.
उगवत्या व मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सूर्यनमस्काराचे ऐतिहासिक महत्त्व
सूर्यनमस्कारात वापरल्या जाणा-या आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. श्री समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र व त्यांचे महत्त्व
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शरीरातील चक्राशी आहे. –
क्र. मंत्र आसन
१. मित्राय नमः अनाहत चक्र
२. रवये नमः विशुद्ध चक्र
३. सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
४. भानवे नमः आज्ञा चक्र
५. खगाय नमः विशुद्ध चक्र
६. पुष्णे नमः मणिपूर चक्र
७. हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
८. मरीचये न मः विशुद्ध चक्र
९. आदित्याय नमः आज्ञा चक्र
१०. सवित्राय नमः स्वाधिष्ठान चक्र
११. अर्काय नमः विशुद्ध चक्र
१२. भास्कराय नमः अनाहत चक्र
सूर्यनमस्कार करताना सूर्याचीच नावे का म्हणावी ?
सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्याचे नामोच्चरण, दर्शन व सूर्यनमस्कार घालणे म्हणजे एकाचवेळी शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक शक्तिंचा विकास साधणे होय. सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे? एवढे सूर्याला महत्त्व आहे.
सूर्यनमस्कारामुळे होणारे लाभ
सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.
No comments:
Post a Comment